नाटक, चित्रपट आणि टि व्ही सिरिअल्स या सर्व माध्यमातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवणारी चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे वंदना गुप्ते. तसं म्हंटलं तर जन्माने नसल्या तरी लग्नानंतरच्या त्या सिकेपी. सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांच्या त्या सुकन्या. प्रसिद्ध अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या त्या भगिनी तसेच आईच्या कोमल सुरांचा वारसा जपणाऱ्या गायिका राणी वर्मा याही त्यांच्याच भगिनी. क्रिमिनल डिफेन्स लॉयर शिरीष गुप्ते हे वंदना गुप्ते यांचे पती.

वंदना गुप्ते यांनी नाटकाद्वारे १९७१मध्ये अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. पु. ल. देशपांडे यांचे 'सुंदर मी होणार' हे त्यांच्या सुरुवातीच्या नाटकांपैकी एक. विजया महेता यांचे 'अखेरचा सवाल' हे वंदना गुप्ते यांचे नाटक खूप गाजले. नंतर संध्याछाया, जस्मा ओडन, चारदिवस प्रेमाचे, सातव्या मुलीची सातवी मुलगी, प्रेमाच्या गावा जावे, झुंज, वाडा चिरेबंदी, गगनभेदी, सोनचाफा, मदनबाधा, पद्मश्री धुंडीराज, रंग उमलत्या मनाचे, चारचौघी, रमले मी, सेलीब्रेशन, श्री तशी सौ, शू: कुठे बोलायचं नाही अशी एकापेक्षा एक वरचढ नाटकं त्यांनी त्यांच्या सकस अभिनयाने यशस्वी केली.

चित्रपटक्षेत्रात वंदना गुप्ते यांनी लपंडाव, पछाडलेला, दिवसेंदिवस, मातीच्या चुली, समांतर, मणिमंगळसूत्र, टाईमप्लिज, आंधळी कोशिंबीर, डबलसीट, फॅमिली कट्टा, फोटोकॉपी या मराठी चित्रपटांतून आपली छाप पाडली. याच बरोबर त्यांनी द अदर एंड ऑफ द लाईन, मिराबाई नॉट आऊट, इट्स ब्रेकिंग न्यूज या हिंदी आणि इंग्लिश सिनेमांतूनही अभिनय केला.

टिव्हीवर त्यांच्या मराठी आणि हिंदी सिरिअल्स खूप गाजल्या. झी टिव्हीची करीना करीना ही तसेच पांडे और पांडे ही मालिका बरीच लोकप्रिय झाली. बंधन सात जन्मो का तसेच सजन रे झूठ मत बोलो या मालिकांनी ही बराच प्रेक्षकवर्ग खेचला. 'या गोजिरवाण्या घरात' आणि 'आंबट गोड' या वंदना गुप्ते यांच्या लोकप्रिय मराठी मालिका. सध्या झी युवावर सुरु असणारी 'रुद्रम' ही त्याची आणखी एक गाजलेली मालिका.

आपल्या सदाबहार अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या वंदना गुप्ते यांना दिर्घायुरोग्य लाभो आणि त्यांच्या उत्तमोत्तम भूमिकांनी रसिक तृप्त होवोत हीच शुभेच्छा.

संकलन - स्वप्ना राजेंद्र दिघे.