बाळासाहेब ठाकरे

" हिंदूहृदयसम्राट " या पदवीने गौरविले गेलेले, शिवसेना प्रमुख बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांची ओळख करून देण्याची गरजच नाही. प्रत्येक मराठी माणसाच्या ह्रदयात त्यांना अढळ स्थान आहे. अत्यंत प्रखर व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट वक्ता, उत्तम चित्रकार, संपादक - लेखक आणि कुशल संघटक असे अनेक पैलू असलेले बाळासाहेब एकमेवद्वितीय होते.

१९६६ साली त्यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. मराठी माणसाचे हितसंवर्धन हा प्रमुख हेतू या पक्षाचा होता. पुढे राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्त्वाचे रक्षण आणि संवर्धन हा व्यापक हेतू या पक्षाने धारण केला. बाळासाहेब त्यांच्या जहाल आणि प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध होते. आपली तत्त्वं आणि पक्षाची धोरणं यांसाठी ते अत्यंत आग्रही होते.

महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड होती. मराठी माणसावर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी प्रसंगी हिंसात्मक उपायही अवलंबले. परप्रांतियांना जरब बसवल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्त ठरले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकीर्दीच्या सुरवातीला त्यांनी इंग्रजी दैनिक 'फ्री प्रेस जर्नल' यात व्यंगचित्रकार म्हणून काम केले. पुढे त्यांनी स्वतःचे राजकीय व्यंगचित्रसाप्ताहिक 'मार्मिक' सुरु केले आणि फ्री प्रेसची नोकरी सोडली.

बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सिताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव बाळासाहेबांवर होता. प्रबोधनकार ठाकरे यांचा बाळासाहेबांची राजकीय मतं आणि तत्त्वं घडवण्यात मोठा हात होता. परप्रांतियांच्या मुंबईवरील वाढत्या रेट्याविरुद्ध बाळासाहेब ठाकरे यांनी 'मार्मिक' मधून प्रहार केले. पण हे प्रयत्न त्यांना अपुरे वाटू लागले म्हणून १९६६ साली त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. परप्रांतियांच्या वाढत्या मुजोरी विरुद्ध मराठी माणसाला जागरूक करणे आणि त्यांचा विरोध करायला पाठबळ देणे हा प्रमुख हेतू या पक्षस्थापनेमागे होता. मराठी माणसाचे राजकीय आणि व्यावसायिक हित जोपासण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना याचे बाळासाहेब संस्थापक संपादक होते. १९९२ - ९३ च्या दंगली नंतर शिवसेनेने हिंदुत्त्वाचा मुद्दा उचलून धरला. १९९९ च्या निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोगाच्या शिफारसीवरून बाळासाहेबांवर मतदान करण्याची आणि निवडणूक लढवण्याची ६ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. कारण देण्यात आले, 'धर्माच्या नावावर मते मागितली' वास्तविक ठाकरे यांनी कधीच कुठलीही निवडणूक लढविली नव्हती किंवा कोणते अधिकृत पदही भूषविले नव्हते.

बाळासाहेबांच्या मताप्रमाणे हिंदूंनी त्यांच्या धर्माच्या रक्षणासाठी आणि त्यांची ओळख टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येणे, संघटीत होणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांच्यात नसलेल्या एकजुटीचा फायदा परधर्मिय घेतील. फक्त परधर्मीयच नव्हे तर हिंदुस्थानावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव वाढेल.

व्यक्तिगत जीवन :- २३ जानेवारी १९२६ रोजी रमाबाई केशव ठाकरे यांच्या पोटी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात बाळासाहेबांचा जन्म झाला. नऊ भावंडांत ते सर्वात थोरले होते. बाळासाहेबांचे वडील केशव सिताराम ठाकरे हे 'प्रबोधन' नावाचे वर्तमानपत्र चालवित असत म्हणून ते 'प्रबोधनकार' या उपाधीने प्रसिद्ध होते.
मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी. बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव हे त्यांचे तीन सुपुत्र. १९९५ मध्ये मीनाताई यांचे निधन झाले. पुढच्याच वर्षी एका अपघातात बिंदुमाधव यांचेही निधन झाले. आता पक्षाची धुरा बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव सांभाळत आहेत.

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांचे हृदयविकाराने निधन झाले आणि संपूर्ण मुंबई स्तब्ध झाली. महाराष्ट्रात राज्यभर हाय अॅलर्ट घोषित करण्यात आला. मुंबई पोलीस, राज्यराखीव पोलीसबल, रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शासकिय इतमामात बंदुकीच्या२१ फैरींची सलामी देत अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाळासाहेबांचे हे अशाप्रकारे झालेले अंत्यसंस्कार हे कोणत्याही शासकीय पदावर नसलेल्या, लोकांनी निवडून न दिलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेली एकमेव घटना म्हणता येईल. मुंबई शहरात सार्वजनिक रीतीने केले गेलेले असे अंत्यसंस्कार या पूर्वी फक्त लोकमान्य टिळकांचेच झाले होते.

जनमानसावर साम्राज्य गाजवणाऱ्या सम्राटाला जनतेने आणि तिच्या लोकनियुक्त प्रतिनिधींनी वाहिलेली ही अभूतपूर्व श्रद्धांजली.

संकलन - स्वप्ना राजेंद्र दिघे.