बाजी प्रभू देशपांडे

शिवरायांच्या चरित्रातील मानाचे पान म्हणजे बाजी प्रभू देशपांडे. आपल्या राजाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणारे, तळहातावर शिर घेऊन अठरा तास गनीमाला रोखून धरत अखेर प्राणार्पण करणारे ते बाजी प्रभू देशपांडे. बाजी प्रभू देशपांडे म्हणजे मूर्तीमंत स्वामिनिष्ठा.

ऐतिहासिक उल्लेखानुसार बाजी प्रभू शिवाजी महाराजांपेक्षा पंधरा वर्षांनी मोठे होते. म्हणजेच त्यांचा जन्म १६१५ साली झाला.

- पावनखिंडीतील लढाई-

अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी विजापुरी फौजेची दाणादाण उडवली आणि विजापुरी मुलुखात खोलवर मुसंडी मारली. लवकरच महाराजांनी कोल्हापूर जवळचा पन्हाळगड काबिज केला. दरम्यान नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखालील फौजेने थेट विजापूरवर हल्ला केला. विजापूरचं नेतृत्व करणाऱ्या सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला आणि महाराजांना त्यांच्या काही सरदार आणि सैनिकांसह स्थानबद्ध केले. नेताजी पालकर आणि त्यांच्या फौजेच्या तुकडीने हा वेढा बाहेरून फोडण्याचे केलेले सर्व प्रयत्न वाया गेले आणि एक धाडसी तितकाच धोकादायक मार्ग काढण्यात आला. महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांनी काही निवडक मावळ्यांसह हा वेढा आतून फोडून बाहेर पडायचे आणि विशाळगडाकडे कूच करायची. जेव्हा सिद्दी जोहरला समजेल, महाराज निसटले. तेव्हा तो पाठलाग करील, त्याला चकवायला शिवा न्हावी नावाच्या माणसाची निवड करण्यात आली. हा शिवा दिसायला बराचसा शिवाजी महाराजांसारखाच होता. याला महाराजांचे कपडे घालून पालखीत बसवून सैन्यासह वेढ्याबाहेर काढायचे ठरले. स्वतः महाराज सामान्य मावळ्याच्या वेशात असणार होते.

सन १६६० साली आषाढ पौर्णिमेच्या भयानक पावसाळी रात्री ६०० निवडक मावळ्यांसह बाजीप्रभू आणि महाराज सिद्दीच्या वेढ्यातून निसटले. त्यांनी विशाळगडाच्या दिशेने कूच केली. सिद्दीच्या फौजेने त्यांचा जारीने पाठलाग केला. पालखीत बसलेले महाराज समजून त्यांनी शिवा न्हाव्याला ताब्यात घेतले आणि पुन्हा माघारी आणले. सोंग उघडकीला आलेले समजताच गनिम आपल्याला जिवंत ठेवणार नाही याची खात्री असलेला शिवा मुकाट्याने शत्रूच्या स्वाधिन झाला. शिवाच्या या बलिदानामुळे पळून जात असलेल्या मराठी फौजेला पुढे जाण्यासाठी अधिक वेळ मिळू शकला.

जेव्हा शत्रूला त्याची चूक कळून आली तेव्हा सिद्दी जोहरचा जावई सिद्दी मसूद याने पुन्हा मराठी फौजेचा पाठलाग करायला सुरवात केली.

घोडखिंडीजवळ पोहचताच पाठलाग करणाऱ्या गनिमाची चाहूल लागली आणि बाजीने महाराजांच्या रक्षणाचा मार्ग काढला. सैन्याचे दोन भाग करण्यात आले. अर्ध्या फौजेसह महाराजांनी विशाळगडाकडे दौड करावी आणि उरलेल्या ३०० मावळ्यांसह बाजी प्रभू आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू यांनी खिंड रोखून धरावी. महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचले की तोफेचे तीन बार करण्यात यावे मगच बाजी प्रभूंनी रोखून धरलेला खिंडीचा मार्ग सोडून विशाळगडाकडे यावे असा ठराव केला गेला.

महाराज अर्ध्या फौजेनिशी पुढे गेले आणि बाजीप्रभू देशपांडे अवघ्या तीनशे मावळ्यांसह खिंडीत पाय रोवून गनिमाला रोखायला सज्ज झाले. सिद्दीची दहा हजार सैनिकांची फौज घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी तब्बल अठरा तास रोखून धरली. दांडपट्टा चालवण्यात प्रवीण असलेले बाजी पराक्रमाची शर्थ करत होते. नखशिखांत रक्ताने न्हालेले बाजीप्रभू प्राणांची पर्वा न करता भक्कमपणे खिंडीत मार्ग रोखून गनिमासमोर उभे ठाकले. त्यांच्या पराक्रमापुढे शत्रूची मोठी संख्या सुद्धा निकामी ठरली.

तीनशे मावळ्यांसह विशाळगडावर चाल करून गेलेल्या महाराजांना सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी या सिद्दीच्या सरदारांशी लढून तो गड ताब्यात घ्यावा लागला. महाराज गडावर पोहोचले त्याचा ताबा घेतला आणि तोफांचे तीन बार झाले.

महाराज सुखरूप विशाळगडावर पोहचल्याची खबर समजली आणि बाजीप्रभूंनी आपला देह ठेवला. बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीला शिवाजी महाराजांनी 'पावनखिंड' या नावाने गौरविले. बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबाला महाराजांनी 'मानाचे पान' दिले.


संकलन - स्वप्ना राजेंद्र दिघे