मोठ्या कोलंबीचे (झिंग्याचे) कालवणसाहित्य : अर्धा किलो मोठी कोलंबी (झिंगे), २ कांदे, २ चहाचे चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, ४ टे. स्पून तेल, एक मोठ्या लिंबा एवढी चिंच, अर्धी वाटी किसलेले, भाजलेले सुखे खोबरे, १ मोठा कांदा, उभा चिरून तेलात परतलेला, ७-८ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, १ चमचा गरम मसाला, १ चमचा मीठ
वाटण नं. १ : लसूण, कोथिंबीर
वाटण नं. २: कोळंबीचे पाय (लहान नांगडे) वाटून गाळून त्याचा रस
वाटण नं. ३ : तळलेला उभा कांदा, भाजलेले सुखे खोबरे

कृती : प्रथम कोळंबी साफ करून (कवच काढणे) पाय तोडून वाटून ठेवणे. कोळंबीला वाटण नं. १ चोळून लावणे. त्याला हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ लावणे. एका भांड्यात तेल टाकून तापवणे. त्यात २ चिमूट हिंग टाकणे. नंतर त्यात खूप बारीक चिरलेला कांदा टाकणे. कांदा ब्राऊन झाल्यावर त्यामध्ये मसाला लावलेली कोलंबी घालून चांगली सवताळून घ्यावी.मग वाटण नं. २ घालून परतत रहावी. मधून मधून चिंचेच्या कोळाचे पाणी घालून सवताळत रहावी. झाकण ठेवू नये. मंद आचेवर शिजत ठेवावी. शिजल्यावर वाटण नं. ३ (तळलेला मसाला) व गरम मसाला टाकावा. पांच मिनिटे उकळी येऊ द्यावी. गॅस बंद करावा. उतरल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.