तेलपोळीसाहित्य : १ वाटी चणा डाळ, २ वाट्या किसलेला गूळ, पाव वाटी साखर, चिमूटभर मीठ, वेलची, जायफळ पावडर, तेल, २ वाट्या बारीक रवा ( झीरो नंबर ), केशर किंवा केशरी रंग, २ चमचे तेल, दूध, पाणी, चिमूटभर मीठ, पोळी लाटण्यासाठी पोळीचा पत्रा, तवा, पोळपाट लाटणे​

कृती:

पुरण - चणाडाळ दोन ते चार तास चांगली भिजवावी, डाळ कुकरमध्ये घालून शिजवून घ्यावी. शिजलेल्या डाळीतील पाणी काढावे. व त्यात चिमूटभर मीठ घालावे. गूळ व साखर घालावे. मधून मधून हलवत राहावे. पूर्ण घट्ट झाले की उतरवावे. पुरण गरम असतानाच पुरणयंत्रांतून काढावे. त्यात वेलची जायफळ पूड घालावी.

रवा भिजवणे - २ वाटी बारीक रवा घेणे. त्याला दोन टेबलस्पून तेल घालून व चिमूटभर मीठ घालून कोरड्या रव्याला चोळून घ्यावे.


नंतर दूध, पाणी केशरी रंग किंवा केशर घालून कणकेसारखे भिजवावे. खूप घट्ट भिजवू नये. हा रवा चार ते पाच तास भिजवावा. नंतर त्याला तेल लावावे. जास्त तेलात ठेवू नये. रवा भिजला कि रव्याचे दोन पुरी एवढे गोळे करावे व त्याच्या पुऱ्या कराव्यात. पत्र्यावर एक पुरीवर पुरणाचा गोळा घ्यावा. दुसरी पुरी त्यावर ठेवावी व सर्व बाजूने बंद करावी. दोन्ही बाजूने भरपूर तेल लावावे व लाटण्याने हलकेच पोळी लाटावी व बाजूच्या कडा सुरीने कापाव्यात व तव्यावर हलकेच टाकावी व त्यावर तेल सोडावे. पोळी उलथताना हलकेच उलथावी व चांगली भाजावी.

ही पोळी साजूक तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबर खावी.