मटणाचे लोणचेसाहित्य : पाव किलो मटण (मटण बोनलेस व कोवळे घ्यावे) स्वच्छ धुवून, ५ लिंबाचा रस, मीठ, थोडी हळद, आले लसणाचे वाटण

वाटण : ६-७ मोठ्या लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा हे वाटण लावून मटण अर्धा तास तसेच ठेवावे. मटण वाफवण्यासाठी पाणी एक ते दीड वाटी, मेथी हिंग मोहरी फोडणी

गरम मसाला पावडर : २ लवंगा, अर्धा दालचिनीचा तुकडा, ४-५ वेलची, ४-५ काळी मिरी, १ चमचा शाहीजीरे, सुख्या २ ते ३ लाल मिरच्या. सर्व पदार्थ गरम करून त्याची पूड करावी. आवडीनुसार तेल मोहरीचे, तिळाचे किंवा कोणतेही घ्यावे, ४-५ लिंबाचा रस
गोड मसाला : दिड चमचा खसखस, धणे अर्धा चमचा, पाव चमचा बडीशेप, जिरे पाव चमचा, १ लहान वाटी सुखे खोबरे भाजून घ्यावे व ह्या सर्वांची पूड करावी. सजावटी साठी पुदिना कोथिंबीर
लोणच्याचा मसाला : तयार लोणच्याचा मसाला, मोहरीचे तेल अथवा तिळाचे तेल ३०० ग्रॅम (दीड वाटी मोठी अंदाजे)

कृती : अर्धा तास मुरत ठेवलेले मटण कुकर मधून चांगले वाफवून घ्यावे, मऊ शिजले पाहिजे. येथे लोणच्यासाठी तिळाचे तेल वापरले आहे. नंतर पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यावर आले लसूण वाटण चांगले परतावे त्यावर मटण परतावे व थंड होऊ द्यावे. ( पाणी पूर्ण आठवावे ), दुसऱ्या पॅनमध्ये दीड वाटी मोहरीचे अथवा तिळाचे तेल टाकून गरम करून घ्यावे. त्यावर राई, हिंग, मेथी चवीनुसार घालावी व फोडणी झाल्यावर लगेच खाली उतरवावे व त्यात गरम मसाला पावडर घालावी. चांगले एकत्र कालवावे.

नंतर लोणच्याचा मसाला घालून पुनः एकत्र कालवावे. त्यावर ४-५ लिंबाचा (अंदाजे १ वाटी रस ) घालून नीट ढवळावे. व पूर्ण थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बाटलीत भरावे, १ दिवस पूर्ण मुरू द्यावे. हे लोणचे १५ दिवस ते १ महिना टिकते. ( चमचा नेहमी कोरडा घालावा ), लोणचे खायला घेताना त्यावर गरम मसाला (खोबऱ्याचा ) कोथिंबीर, पुदिना यांच्या बारीक कापलेल्या पानानी सजवावे. इतर सजावट करावी.

ज्वारीची भाकरी हाताने ठेचलेला पातीचा ओला कांदा बाजूला भाजलेले शेंगदाणे ह्या बरोबर, हे घाटी लोणचे खाण्याची पद्धत आहे. (देशावर, घाटावर) पण तुम्ही तुमच्या आवडीच्या पदार्थाबरोबर खाल्ले तरी हे लोणचे अतिशय चविष्ट लागते.