खिम्याची अळू वाडीसाहित्य : १२ अळूची पाने, अर्धा किलो खिमा, २ वाट्या बेसन, पाऊण वाटी भाजलेल्या सुख्या खोबऱ्याचे वाटण, चिंच १ चमचा गरम मसाला, ३ चमचे लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा हळद, १०-१२ लसूण पाकळ्या, १ इंच आले, कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस चवीपुरते मीठ, तेल

प्रथम खिमा (मटण) स्वच्छ धुऊन त्याला आले, लसूण, कोथिंबीरीचे वाटण चोळावे. हळद, तिखट, मीठ व लिंबूरस टाकावा. हे सर्व लावलेला खिमा १ तास बाजूला ठेवावा.

कृती : पातेल्यावर १ टे. स्पून तेल टाकून त्यात खडा मसाला (२ तमालपत्र, ३ लवंग, बडी वेलची २, मिरे ७-८) टाकणे. त्यात वरील मसाला लावलेला खिमा टाकून चांगला परतावा आणि शिजवून घ्यावा. एकदम चांगले कोरडे करून घ्यावे. एका वाडग्यात बेसन घेऊन त्यात शिजवलेला खिमा, सुख्या खोबऱ्याचे वाटण, गरम मसाला, चवीपुरते मीठ टाकून चांगले एकजीव करावे. साधारण घट्ट (थुलथुलीत) भिजवावे. अळूची पाने लाटण्याने थोडी लाटून वरील शिरा काढाव्यात. त्या पानाला चिंचेच्या कोळाचे पाणी लावावे. त्यावर वरील खिम्याचे मिश्रण लावावे. सर्व बाजूला सारखे पसरवावे. परत त्यावर दुसरे पान ठेऊन वरील प्रमाणे करावे अशी एकावर एक ५-६ पाने लावावीत. मग त्याची गुंडाळी करावी हि गुंडाळी घट्ट करावी आणि मोदकपात्रात अर्धा तास वाफ काढावी.

थंड झाल्यावर जाड वड्या पाडाव्यात आणि तळाव्यात कुरकुरीत होतात.