खाजाचे कानवलेसाहित्य : पिठी - २५० ग्रॅम सुके खोबरे, १०० ग्राम खसखस, १ वाटी गव्हाचे पीठ, ५०० ग्रॅम पिठीसाखर, तूप, वेलची पावडर ३ चमचे

कानवल्याचे आवरण - पाव किलो बारीक रवा, २ चमचे तूप, भिजवण्यासाठी दूध, चावीपुरते मीठ, ५० ग्रॅम तूप, ४ चमचे कॉनफ्लोअर, ४ चमचे आरारूट, तळण्यासाठी तूप

कृती : खोबऱ्याच्या पाठी काढून खोबरे किसून घ्यावे नंतर खोबरे मंद आचेवर खरपूस भाजावे, तसेच खसखसही भाजून घ्यावी. २ चमचे तूप तापवून त्यात गव्हाचे पीठ घालून खरपूस भाजून घ्यावे. खसखस -खोबरे मिक्सर मधून काढून घ्यावे. गार झाल्यावर खोबरे, खसखस, पीठ, पिठीसाखर, वेलची पूड सर्व एकत्र करून पीठी तयार करून घ्या.

बारीक रवा, दुधामध्ये २ तास भिजवून ठेवा.

५० ग्रॅम तूप चांगले फेसून घ्या. त्यात कॉनफ्लोअर व आरारूट घालून सारण तयार करून घ्या.

रव्याचा मूठभर गोळा घ्या त्याला तूप लावून घ्या. व मिक्सरवर ५ - ७ मिनिटे फिरवा. नंतर त्याची पोळी लाटा, पोळीला बोटांनी भोके पाडा त्यावर थोडासा तुपाचा हात फिरवून सारण लावून घ्या. पोळीच्या चारही कडा दुमडून त्यावर सारण लावा आणि त्याची गुंडाळी करा. नंतर सुरीने त्याचे ३-४ गोळे कापा त्याला दोन्ही हातांनी व्यवस्थित पागोटे घाला. एका गोळ्याची पापडी लाटा, लाटताना कॉनफ्लोअर लावा, पापडीवर पिठी भरून कानवला कातून घ्या. कढईत तूप तापत ठेऊन तूप तापल्यावर एक एक कानवला मंद अग्नीवर तळून घ्या. गरमागरम खुसखुशीत कानवले तयार.

टीप : कानवल्याचे पीठ ओल्या पांढऱ्या फडक्यानी झाकून ठेवा. कानवला तळण्याआधी ओल्या पांढऱ्या फडक्याखाली झाकला नाहीतर कानवले सुकतात व फुटू शकतात.