मराठी साहित्यात अग्रक्रमाने ज्यांचे नाव घेतले जाते ते राम गणेश गडकरी हे नाटककार, कवी आणि विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होते. अवघ्या ३५ वर्षांचं आयुष्य लाभलेलं हे साहित्यरत्न. यांचा जन्म २४ मे १८८५ मध्ये गुजराथ मधील नवसारी जिल्ह्यातील गणदेवी येथे झाला.

मराठी साहित्य आपल्या पारंपरिक संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य (शाहिरीकाव्य) या ठराविक साच्यातून बाहेर पडून नवे रूप घेत होते त्या परिवर्तन काळातील गडकरी हे एक अग्रगण्य साहित्यिक होते. त्यांनी नाटके, कविता आणि विनोदी लेख हे सर्व लेखन प्रकार सारख्याच सक्षमतेने समर्थपणे हाताळले. त्यांची सर्व साहित्यकृती ही उच्च दर्जाची आहे. त्यांनी नाटके जरी त्यांच्या मूळ नावाने लिहिली असली तरी कविता त्यांनी 'गोविंदाग्रज' या नावाने प्रसिद्ध केल्या आणि विनोदी लेखनासाठी 'बाळकराम' हे टोपणनाव घेतले होते.

राम गणेश गडकरी यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यांच्या शालेय शिक्षणात गरिबीमुळे खंड पडला. त्यांचे शालेय शिक्षण त्यांच्या १९व्या वर्षी पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्गसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण पहिल्याच वर्षी गणितात नापास झाल्याने त्यांनी कॉलेज सोडून शिक्षकी पेशा पत्करला आणि साहित्याची आराधना करण्यास सुरवात केली.

वयाच्या १९व्या वर्षापर्यंत त्यांना मराठी नीट बोलताही येत नसे. त्यानंतर मराठी, संस्कृत आणि इंग्लिश या भाषांचा गडकरी यांनी कसून अभ्यास केला. कालिदास, भवभूती यांच्या संस्कृत साहित्यकृती, ज्ञानेश्वर, मोरोपंत यांचे जुने मराठी काव्य तसेच केशवसुत, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या समकालीन साहित्यिकांचे मराठी साहित्य आणि शेक्सपिअर, शेली यांचे इंग्रजी साहित्य यांचा गाढा अभ्यास त्यांनी केला.

त्यांनी केलेल्या साहित्यनिर्मितीत ४ पूर्ण नाटके, २ अपूर्ण नाटके, १५० कविता आणि काही विनोदी लेखांचा समावेश होतो. 'भावबंधन' हे त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी काही तासच आधी लिहून पूर्ण केलेले शेवटचे नाटक होय.

गडकरी यांचा दोन वेळा विवाह झाला. प्रथम पत्नी सीताबाई यांना त्यांनी सोडून दिले. त्यांच्या द्वितीय पत्नी रमाबाई या त्यांच्या पेक्षा १७ वर्षांनी लहान होत्या. हाही विवाह फारसा सुखाचा ठरला नाही. वैवाहिक सुखाच्या बाबतीत गडकरी कमनशिबी ठरले. २३ जानेवारी १९१९ रोजी त्यांचे नागपूर जवळच्या सावनेर येथे वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झाले.

एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही त्यांनी लिहून पूर्ण केलेली ४ नाटके. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर त्यांच्या मते गडकरी हे भारतातील कुठल्याही भाषेतील कवी-नाटककार यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. कालिदासानंतर भारतात घडलेला हा सर्वोत्कृष्ट साहित्यकार आहे असे तेंडुलकर म्हणत.

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या मते गडकरी यांनी साहित्य संपदेच्या रूपात मराठी भाषेला दिलेले योगदान सर्वोच्च स्थानी आहे. विशेषतः त्यांची नाटके सर्वतोपरि आहेत. आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी यांना जवळून ओळखत असत. गडकरी यांना ते गुरुस्थानी मानत असत.

गडकरी यांच्या निधनानंतर किर्लोस्कर नाटक कंपनीने काढलेले 'एकच प्याला' हे नाटक खूपच गाजले. या नाटकात दारूबाज नवरा आणि त्याची पतिव्रता पत्नी सिंधू यांची कथा सांगितली आहे. दारूमुळे संसाराचा नाश होऊन दारिद्र्य भोगावे लागलेली सिंधू महान अभिनेते गायक बालगंधर्व यांनी जिवंत केली. त्याकाळी बालगंधर्व हे आपल्या विविध स्री भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. प्रत्येक भूमिकेतील त्यांच्या भारी किमतीच्या साड्या व दागिने यांची चर्चा प्रेक्षकवर्गात होत असे. राम गणेश गडकरी यांनी त्यांना आव्हान दिले, "तुम्हाला मी माझ्या नाटकात रंगमंचावर जुनेरं नेसून भूमिका करायला लावेन आणि ती ही तेवढीच गाजेल." आजही 'एकच प्याला' चा उल्लेख बालगंधर्वांखेरीस होत नाही आणि मराठी रंगभूमीचा उल्लेख 'एकच प्याला' या अजरामर नाटकाखेरीस होऊच शकत नाही. गडकरी यांची सर्व नाटके त्यांचे शब्दसामर्थ्य आणि भाषेवरील प्रभुत्त्व दर्शवितात.

राम गणेश गडकरी हे खरोखर शब्दप्रभू होते. त्यांच्या अकाली निधनामुळे अपूर्ण राहिलेल्या नाटकांत गर्वनिर्वाण, वेड्यांचा बाजार, राजसंन्यास यांचा समावेश होतो. 'वाग्वैजयंती' हा त्यांचा काव्यसंग्रह आणि 'संपूर्ण बाळकराम' हा विनोदी लेखसंग्रह होय.

संकलन - स्वप्ना राजेंद्र दिघे