तिरंगी मोदकसाहित्य : २ वाट्या बासमती तांदळाचे पिठ, २ वाट्या ओल्या नारळाचे खोबरे, २ वाट्या गूळ, चवीप्रमाणे मीठ, १ चमचा तूप, १ चमचा खसखस, अर्धा चमचा वेलची व जायफळ पूड, आपल्या आवडीप्रमाणे कुठलेही दोन रंग

कृती : ओले खोबरे, गूळ, मीठ, खसखस घालून चव शिजवून घ्यावा. गार झाल्यावर त्यामध्ये जायफळ व वेलची पूड घालावी. एका पातेल्यात २ वाट्या पाणी गॅसवर उकळत ठेवावे. पाणी उकळत असताना त्यात थोडे मीठ व तूप घालावे. लगेच पीठ घालून गॅस बारीक करून वाफ आणावी. वाफ आल्यावर पीठ गरम असताना पिठाला पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यावे. पिठाचे तीन भाग करावे. एक गोळ्यात (मोठ्या) आवडीप्रमाणे रंग घालावा. दुसऱ्या भागाला दुसरा रंग घालावा. तिसरा गोळा तसाच पांढरा ठेवावा. तिन्ही पिठाचे पेढ्या एवढे गोळे करून एकत्र गोळा बनवून नंतर आंगठा व मधले बोट याच्या सहाय्याने पाकळ्या करून त्यात चव भरावा व वरून तोंड बंद करून वर पाकळी करावी. चाळणीला थोडे तेल लावून मोदक अलगत थंड पाण्यात बुडवून चाळणीत ठेवावे. अशा तऱ्हेने सर्व मोदक मोदकपात्रात वाफ आणण्यास ठेवावे. १० मि. वाफ द्यावी थंड झाल्यावर मोदक काढावे.