स्टफ्ड पापलेट विथ प्रॉन्ससाहित्य : १ मध्यम आकाराचे पापलेट, १ वाटा मध्यम आकाराची कोळंबी, १ कांदा, आलं-लसूण, मिरची, कोथिंबीरीचे कोलंबीसाठी वाटण, (२-३ टेबलस्पून) २ टेबलस्पून आलं व लसणाचे वेगळे वाटण, अर्धे लिंबू, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा चिंचेचा कोळ, १ अंड, ब्रेड क्रम्ब्स, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी अंड्याचे काप, केळीचे पान.

कृती : प्रथम पापलेट स्वच्छ धुऊन त्याचा मधला काटा काढून घ्यावा व त्याला वरून अलगत ३-४ खाचा कराव्यात. पापलेटाला थोडे मीठ, हळद, लिंबू व आलं-लसूणाची पेस्ट आतून व वरून लावून घ्यावी. १५ मिनिटे त्याचे मॅरिनेशन होऊ द्यावे. नंतर कोलंबी दोरे काढून स्वच्छ धुऊन घ्यावी. कोळंबीला आलं-लसूण, मिरची, कोथिंबीरीचे वाटण, हळद, तिखट, मीठ व चिंचेचा कोळ लावून घ्यावा. एका कढईत तेल टाकून त्यावर कांदा परतावा त्यावर कोलंबी घालून ती सुखी होई पर्यंत परतावी,थंड झाल्यावर मॅरीनेट झालेल्या पापलेटमध्ये व्यवस्थित भरावी. नंतर पापलेटला, तळताना कोळंबी बाहेर येऊ नये म्हणून दोरा बांधावा किंवा सुई दोऱ्याने शिवावे.

पापलेटला वरून ब्रशने अंड लावून घ्यावे व ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करावे. केळीच्या पानात अंड्याच्या चकत्यांची सजावट करून सर्व्ह करावे.