भरडा भरलेल्या चिंबोऱ्यासाहित्य : मध्यम आकाराच्या ६ चिंबोऱ्या, चणाडाळ अर्धा (मध्यम आकाराचा) पेला, रवा (मध्यम आकाराचा) अर्धा पेला, चिंचेचा कोळ २ चहाचे चमचे, कांदे बारीक चिरलेले, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, आलं-लसूण वाटण ३ चहाचे चमचे, तेल १ मध्यम वाटी

मसाला : कांदे २ मध्यम आकाराचे उभे चिरलेले, अर्धी वाटी भाजलेले सुके खोबरे, धणे ४ चहाचे चमचे, बडिशेप १ चहाचा चमचा, शहाजिरे १ चहाचा चमचा, १ चहाचा चमचा मिरे, लवंगा ६, दालचिनी २ इंच.

कृती : भरडा - चणाडाळ चांगली खमंग भाजून घेणे, नंतर मिक्सरवर जाडसर दळून घेणे (भरडा)

मसाला : तेलावर उभा चिरलेला कांदा लालसर भाजून घेणे नंतर त्यात धणे घालून भाजणे नंतर उरलेला मसाला (बडीशेप, जिरे, शाहीजीरे, लवंगा, दालचिनी) घालून थोडा वेळ भाजणे, सर्वात शेवटी खोबरे घालून गॅस बंद करणे, थंड झाल्यावर सर्व मसाला बारीक वाटून घेणे. चिंबोरीचे पाय वाटून घेणे.

मुख्य कृती : प्रथम चिंबोरी साफ करून घेणे कवच व पेंदा वेगळा करून लाख असल्यास वेगळी काढून कवच साफ करून ठेवणे. पेंदा व नांग्याना, आधी आलं-लसूण पेस्ट व हळद, तिखट, मीठ लावून ठेवणे.

चिंबोरीच्या पायाचा रस, चिंचेचा कोळ, वाटलेला मसाला, उरलेली आलं-लसूण पेस्ट एकत्र करणे. त्यात डाळीचा भरडा व रवा कालवणे. चवीनुसार हळद, तिखट, मीठ, घालून कालवणे. (पाणी घालू नये) वरील मिश्रण भज्यांच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे.

मिश्रणाचे ६ भाग करून घेणे चिंबोरीच्या कवचात मसाला भरून त्यावर पेंदा ठेऊन कच्चा दोऱ्याने गुंडाळणे. अशा रीतीने प्रत्येक चिंबोरी भरून घेणे.

पसरट पातेल्यात तेल तापवून घेणे, त्यात हिंग टाकून बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेणे, आता त्यात एकेक चिंबोरी, पेंदावर येईल अशा रीतीने ठेवणे. नांग्या व उरलेला मसाला घालून एक वाफ आणणे. नंतर चिंबोऱ्या आसडुन पाठी कडील बाजू वर येईल अशा करणे. आता पातेल्याखाली तवा व झाकणावर पाणी ठेऊन ८ ते १० मिनिटे गॅस बारीक करून ठेवणे. नंतर झाकणावरील पाणी फेकून देऊन परत पातेल्यावर झाकण ठेवणे व गॅस बंद करणे.

हा पदार्थ स्टार्टर म्हणून खाऊ शकतो. चपाती, भाकरी बरोबर खायचा असल्यास थोडासा रस्सा ठेवावा.