शेवळाची कणी (सोडे घातलेली)साहित्य: शेवळाच्या ४ जुड्या, कांदे २/३, सुक्या खोबऱ्याचा किस अर्धी वाटी, तेल अर्धी वाटी, चणाडाळीचा भरडा १ वाटी, सोडे पाव वाटी, चिंच, गुळाचा लहानसा खडा, आलं लसूण गोळी, गरम मसाला २ चमचे, हळद, तिखट, मीठ आवश्यकतेनुसार

कृती: प्रत्येक शेवळाचं वरचं साल व देठाशी असलेला शेंदरी भाग काढून टाकावा. शेवळं धुवून बारीक चिरून घ्यावी. १०-१२ काकडं कुकरमध्ये शिजवून त्याच्या बिया काढून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. सोड्याचे बारीक तुकडे करून त्याला हळद, तिखट, मीठ, व लसणीची गोळी लावून ठेवावी.
थोड्या तेलावर चिरलेली शेवळं व वाटलेल्या काकडाचा गोळा, हळद, तिखट, मीठ, चिंचेचा थोडा कोळ टाकून परतवून घेऊन कुकर मधून शिजवून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यात तेल टाकून ३-४ लसणाच्या पाकळ्या व कांदा घालून परतावे. गुलाबी झाल्यावर त्यात सोडे चांगले सवताळून घ्यावे. नंतर शेवळाची शिजलेली भाजी, तळलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण, चिंचेचा कोळ, गुळाचा लहानसा खडा, डाळीचा भरडा, गरम मसाला, गरज वाटल्यास थोडे तिखट, मीठ घालून सगळं परतून एकजीव करावे. झाकणात पाणी घालून वाफेवर शिजवत ठेवावे. मधून मधून पाण्याचा हबका मारावा. भाजी मोकळी होई पर्यंत परतून घ्यावी. ही शेवळाची कणी नुसती खाण्यासही चविष्ट लागते.