पुराणातील उल्लेखानुसार चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचे मूळ हैहयवंशीय सहस्रार्जुनापर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. परशुरामाने केलेल्या क्षत्रियसंहाराच्या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने पृथ्वी नि:क्षत्रिय करण्यासाठी २१ प्रयत्न केले.त्यातून सहस्रार्जुनाच्या कुळातील जे थोडे क्षत्रिय वाचले त्यापैकी चंद्रसेन राजाचे वंशज म्हणजेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभू.

इतिहासकारांच्या कालगणनेनुसार हैहयवंशी सहस्रार्जुन याचा पुत्र चंद्रसेन याचा कालखंड इ. स. पूर्व साडेतीन हजार वर्ष हा मानला जातो. एवढ्या प्राचीन राजवंशाचा इतिहास कुठेही लिखित स्वरूपात नाही. मात्र मगध देशातील चंद्रगुप्त मौर्य याच्या घराण्याचा कालखंड इ. स. पूर्व ३२१ असा धरला जातो. ह्याच कुळात 'सम्राट अशोक' हा राजा होऊन गेला. ह्या घराण्याचा काळ अंदाजे ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांचा समजला जातो. प्रत्येक पिढी तीस वर्षांची मानली तर मागच्या पंच्याण्णव पिढ्यांचा काळ ९५ * ३० = २८५० वर्षे म्हणजे हैहयवंशीय चंद्रसेनाचा काळ २८५० + ४०० = ३२५० वर्षांचा होतो. चंद्रसेनाच्या १२७ वंशजांपर्यंतची वंशावळ इतिहासकार देतात. त्यातील कनककृतवर्मा हा इ.स. ५६० मध्ये होऊन गेला असे म्हटले जाते.

इतिहासाचा मागोवा घेताना असे आढळून येते की चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचे पूर्वज काश्मिरपासून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश इत्यादी प्रदेशांतून स्थलांतर करत करत माळव्यातील धारजवळच्या मांडवगडमध्ये बराच काळ स्थिरावले. त्यांच्यापैकी काही शिलाहार राजांच्या कारकिर्दीत ( इ. स. ८१० ते १२६० ) कोकणात चौल, ठाणे या भागांत येऊन राहिले.

शिलाहार राजांनी मुंबई तसेच ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील काही भागांवर ४०० वर्ष राज्य केले. शिलाहारांच्या शिलालेखांवरून असे समजते की कायस्थ प्रभू, पाठारे प्रभू आणि यजुर्वेदी ब्राह्मण इतर काही जातींसह ९व्या शतकापासून मुंबई आणि आसपास स्थायिक झाले होते.

इ. स. ६३० च्या सुमारास श्रीविद्यालंकार भारती नावाच्या शंकराचार्याने, त्यावेळी अस्तित्वात असलेल्या चातुर्वर्ण्यातून जाती व्यवस्था तयार केली असे मानले जाते. म्हणजेच कायस्थ प्रभू ज्ञातीचे कोकणातील अस्तित्व नवव्या शतकापासून असल्याचे सिद्ध होते.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू उत्तरेकडून स्थलांतर करीत कोकणात आले ते एकाच वेळी एकाच कालखंडात आले नाहीत तर ते वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या मार्गांनी आले.

शिलाहार राजांच्या मंत्रिमंडळात पद्मप्रभू, दादप्रभू, झांपडप्रभू इत्यादी प्रभू पुरुषांचा समावेश प्रधान, संधिविग्रहिक इत्यादी पदांवर झालेला आढळून येतो. इ. स. १०८८ च्या चेऊल येथील शिलालेखात वेलजी प्रभूचा उल्लेख आहे. तर इ. स. ११८२ च्या शिलालेखात अनंतराय प्रभूचा उल्लेख आहे.

शिलाहार राजांच्या बरोबर नवव्या शतकात कोकणात आलेल्या प्रभूंचा हा गट पहिला मानला तर त्यानंतर बाराव्या शतकात कर्नाटकातून कर्ण राजांबरोबर कोकणात आलेल्यांचा गट हा दुसरा गट मानावा लागेल.

बाराव्या शतकात कर्नाटकातील कल्याणी येथे हैहयवंशीय कलचुरीशाखीय महामंडलेश्वर त्रिभुवनमल्ल विज्जल ह्याने आपले साम्राज्य स्थापन केले होते. याच वंशातील कोक्कल राजाच्या शाखेत कर्ण हा महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याचे वंशज यशकर्ण, गयकर्ण या नावांनी ओळखले जात. त्यांना कर्ण ही उपाधी मिळाली. ह्या कलचुरी क्षत्रिय राजांचे कर्नाटकातील राज्य इ.स. ११८३ च्या सुमारास नष्ट झाले. तेव्हा ते कोकणातील शिलाहारांच्या आश्रयास गेले. हे कर्णवंशीय कोकणात आल्यानंतर 'कर्णिक' उपनाव लावू लागले. चेऊल, आक्षी, थळ, दंडाराजपुरी, दिवा, श्रीवर्धन, महाड इत्यादी ठिकाणी ते पसरले आणि स्थायिक झाले.

त्यानंतर चां. कां. प्रभूंचा तिसरा गट भारतात मुसलमानी अंमल सुरु झाल्यानंतर कोकणात आला. सन १३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या ऐनउलमुल्क या सरदाराने मांडवगड किल्ल्यावर कब्जा केला. त्यावेळी तिकडून चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या २६ गोत्रांची, ३६ कुळांची, ४२ कुटुंबीयांची सुमारे ५०० माणसे दक्षिणेत स्थलांतरित झाली. कायस्थ प्रभूंचा कोकणात आलेला हा शेवटचा गट मानला जातो.
यांपैकी काही परिवार मांडवगडहून खंबायतला गेले आणि तेथून जलमार्गाने पुढे जात जात समुद्रकिनाऱ्यानजीक दमणपासून दाभोळ पर्यंत स्थायिक झाले. काही सह्याद्रिपठार मार्गाने मावळच्या प्रदेशांत जाऊन राहिले. मावळात उतरलेले काही जण नागरीवस्तीतील यावनी सत्तेच्या वाटेस जावे लागू नये म्हणून डोंगरघाटातील दऱ्याखोऱ्यात झाडझडोरा तोडून गावे वसवून राहिले. कालांतराने दक्षिणेतही मुसलमानांचे प्राबल्य वाढू लागले तेव्हा ह्या लोकांनी यवन राजांच्या चाकरीत राहून देशमुख, देशपांडे, देशकुळकर्णी इत्यादी वतने मिळवली. बहामनी बादशाहांच्या कारकिर्दीत ते स्वगुणांनी आणि स्वकर्तृत्वाने चमकले.

१४२६ साली बेदरच्या बादशहाने दिलेल्या सनदेत परशुराम कर्णिक याचा बहुमानपूर्वक उल्लेख आहे. तसेच १४२९ साली दुर्गादेवीच्या दुष्काळानंतर झालेले बंड मोडून काढण्यासाठी बहामनी बादशहाने सैन्य पाठवले होते. त्या सैन्याला मदत केल्याबद्धल आतवणे व नाते येथील देशमुखांस बादशहाने अभंगराव, आदरराव, सर्जेराव अशा पदव्या बहाल केल्याचा उल्लेख सापडतो. चौल येथील चौबळ घराण्याचे मूळ पुरुष नारायण कृष्ण देशपांडे यांस बादशहाने चौल प्रांतांचे सुभेदार नेमले व त्यांस पालखीची नेमणूक करून दिली. तेव्हापासून पुढे त्यांनी व त्यांच्या वंशजांनी त्या प्रांतात राहून सरहद्दीवर नवे किल्ले बांधण्यासाठी नकाशे तयार करणे, खर्चाचे अंदाज बांधून देणे, मामलतीचे अधिकारपद भूषविणे इ. कामे केली आणि ते सुभेदारकी, सरदारकी मिळवत गेले.

सतराव्या शतकात मराठी स्वराज्याच्या काळात शिवाजी महाराजांचे त्यांच्या बालपणी संगोपन करणारे, त्यांच्याबरोबर स्वराज्यस्थापनेची शपथ घेऊन महाराजांच्या खांद्याला खांदा भिडवून लढणारे, महाराजांबरोबर सावलीप्रमाणे राहणारे असंख्य प्रभूवीर होऊन गेले. बाजीप्रभू देशपांडे हे त्यातील एक ठळक नाव. शेवटच्या छत्रपतींच्या अंतापर्यंत मराठी स्वराज्याकरिता असंख्य प्रभू वीरपुरुषांनी बलिदान केले.संकलक : स्वप्ना राजेंद्र दिघे.
संदर्भ : प्रभुकुलदीपिका
लेखक : कै. रामराव नारायण प्रधान विळेकर.