शेवळाच्या रुमाली वड्यासाहित्य : शेवळं २५ ते ३०, काकडं ७-८ , २ मोठे बारीक चिरलेले कांदे, २ टीस्पून तिखट, हळद, चिंचेचा कोळ २ टीस्पून, अर्धा टीस्पून हिंग, ३ वाट्या बेसन, तेल २-३ टेबल स्पून, मीठ, गूळ चवी नुसार.

तयारी:
हिरवं वाटण : २ मिरच्या, कोथिंबीर, आलं १ इंच, लसूण ५-६ पाकळ्या एकत्र वाटलेलं

तळला मसाला : सुके खोबरे १ वाटी, १ मोठा कांदा उभा चिरून, दालचिनी १ इंच, लवंगा ५-६, धणे २ टीस्पून सर्व थोड्या तेलावर भाजून एकत्र वाटून घेणे.

सारण : २ वाट्या ओले खोबरे, अर्धी वाटी भाजलेली खसखस, १ चमचा लिंबाचा रस, थोडी चिरलेली कोथिंबीर, सर्व एकत्र करणे.

कृती :

शेवाळं सोलून त्याचा नारंगी शेंडा तोडून टाकणे नंतर स्वच्छ धुवून एकदम कोरडी करणे व बारीक चिरून घेणे. एका मोठ्या कढईत तेल गरम करून त्यात हिंग व चिरलेला कांदा घालणे. कांदा लालसर झाल्यावर त्यात चिरलेली शेवळं टाकणे व खूप वेळ परतत राहणे नंतर त्यात काकडं चिरून त्यातली बी काढून त्याची पेस्ट करून घालणे. नंतर हिरवं वाटण व तळला मसाला घालून व्यवस्थित परतून घेणे. नंतर त्यात तिखट व हळद घालून ३-४ वाट्या पाणी घालून बारीक गॅसवर शिजवून घेणे. भाजी नीट शिजल्यावर त्यात मीठ व चिंचेचा कोळ व गूळ घालून छान परतवून घेणे. त्यात चण्याच्या डाळीचे पीठ घालून सर्व एकत्र ढवळत रहाणे. पीठ घट्ट होत आले कि पिठला वाफ आणण्यासाठी गॅस बारीक करून झाकण ठेवणे. चांगली दणदणीत वाफ आल्यावर गॅस बंद करणे.

१ मोठा सुती रुमाल ओला करून घ्यावा तो पसरवून त्यावर हे मिश्रण गरम असतानाच गोल चपाती सारखे पसरवून घ्यावे. त्यावर सारणाचे साहित्य पसरवावे. नंतर रुमालाने त्याची घट्ट गुंडाळी करून त्याला त्रिकोणी आकार द्यावा. गुंडाळी थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून फ्रायपॅनमध्ये शॅलो फ्राय करणे. गरम गरम सर्व्ह करणे.