वडीचे सांबारसाहित्य : २ वाट्या डाळीचे पीठ, अर्धा इंच आले, ४-५ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, मीठ, अर्धा चमचा साखर, १ चमचा धणे, लवंग, दालचिनी पूड, १ चमचा बडीशेप, १ कांदा, एक वाटी खोबरे, कोथांबीर

रस्सा : १ कांदा, अर्धी वाटी नारळाचे दूध, २ वेलची, दालचिनी तुकडे, २ चमचे डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हळद

कृती : १ कांदा बारीक चिरून थोड्या तेलावर परतून घ्यावा नंतर आले, लसूण, खोबर, मिरच्या, बडीशेप हे सर्व एकत्र करून वाटून घ्यावे. कढईत दीड वाटी पाणी घेऊन त्यात वरील अर्धे वाटण, मीठ, १ चमचा गरम मसाला पावडर व दोन वाट्या डाळीचे पीठ टाकून ढवळावे व झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी, पिठाच्या वड्या थापण्या इतपत गोळा झाल्यावर एका ताटलीला तेलाचा हात फिरवावा व पीठ थापून त्याच्या वड्या कापाव्यात.
दुसऱ्या पातेल्यात तेल टाकून लवंग, वेलची, हिंग, हळद, मोहरी यांची फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, थोडेसे वाटण घालून परतावे. (अधिक चव व रंगासाठी वाटण करताना त्यात एक टोमॅटोही टाकल्यास उत्तम) नंतर त्यात दीडवाटी पाणी, अर्धा वाटी नारळाचे दूध, मीठ, गरम मसाला पावडर, चवीनुसार साखर व दोन चमचे डाळीचे पीठ घालावे. चांगली उकळी येऊ द्यावी. पिठाच्या वड्या या पाण्यात सोडाव्यात व अलगद ढवळावे. मंद आचेवर दोन-तीन मिनिटे शिजू द्यावे व आच बंद करावी. वरून कोथिंबीर पेरावी. (पिठाच्या वड्या थोड्या तेलात तळून घेतल्यास जास्त रुचकर लागतात) असे हे वड्यांचे सांबार आयत्या वेळी झटपट २० ते २५ मिनटात होऊ शकते व भात, चपाती, फुलके कशा बरोबरही खाता येते.