शिंगाड्याच्या पिठाची खांडवीसाहित्य : नारळाचे दूध ३ वाट्या, साखर १ वाटी, १ वाटी शिंगाड्याचे पीठ, साजूक तूप दोन चमचे, थोडी वेलची पूड

कृती : प्रथम जाड बुडाच्या पातेल्यामध्ये पांढऱ्या शुभ्र ओल्या खोबऱ्याचे तीन वाट्या दूध गाळून घ्यावे. त्यात एक वाटी साखर व एक वाटी शिंगाड्याचे पीठ एकजीव करून मिश्रण मंद गॅसवर ठेवावे. हे मिश्रण सतत हलवत रहावे. थोडेसे घट्ट होत आले कि दोन चमचे तूप टाकावे. कडा सुटू लागताच ताबडतोब पसरट थाळ्यात ओतावे. लवलवीत असल्यामुळे थाळा थोडा हाताने हलवल्यास थाळाभर सारखे पसरले जाते. मिश्रण थोडे थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात. शिंगाड्याची खांडवी तयार.

टिप : आधुनिक भाषेतील हे शिंगाड्याचे पुडींग लज्जतदार चवीमुळे खास उपवासापासून कोणत्याही वेळी करता येते. सीकेपी भगिनी गेल्या कित्येक पिढ्या हे करीत आहेत.