अनारसासाहित्य : जुने तांदूळ, गूळ, तूप, खसखस, केळं, तळण्यासाठी तूप.

कृती : अनारसा पीठ : तांदूळ, तीन दिवस पाण्यात भिजत ठेवावे. तीन दिवस पाणी बदलत रहावे. तिसऱ्या दिवशी तांदूळ फडक्यावर पसरून कोरडे करावे. किंचित ओलसर असताना ते कुटावे नंतर पिठाच्या चाळणीने चाळावे. जेवढे पीठ निघेल तेवढाच गूळ घ्यावा. दोन वाट्या पिठास दोन वाट्या गूळ व चार चमचे तूप घ्यावे. पीठ, गूळ व तूप एकजीव होईपर्यंत कुटावे चांगले मऊ झाल्यावर त्याचे गोळे करून डब्यात ठेवावे. पाच सहा दिवसांनी अनारशासाठी पीठ तयार होते. एक दोन दिवसांनी डबा उघडून पहावे. पिठ फार कोरडे वाटल्यास त्यात केळे घालावे, पीठ मऊ होते.
कृती : तयार झालेले पीठ परातीत मळावे नंतर त्याचे पेढ्याएवढे गोळे करावे. पोळपाटावर खसखस पसरून त्यावर गोळी दोन बोटांनी गोल गोल फिरवत थापावी. कढईत तूप तापवून त्यावर तयार झालेला अनारसा मंद आचेवर खसखशीची बाजू वर घेऊन तळावे.