सी.के.पी. मटण - वडे

साहित्य : २५० ग्रॅम मटण, ३ कांदे, १५ ते २० लसूण पाकळ्या, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, ३ इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर, ( ४ ते ५ दांड्या) गरम खडा मसाला, एक चिमूटभर हिंग, पाव वाटी किसलेलं खोबर, पाच ते सहा मिरे, दोन इंच दालचिनी, एक चमचा गरम मसाला, दोन चमचे सीकेपी तिखट, अर्धा चमचा हळद, तेल, चवीनुसार मीठ.कृती : प्रथम मटण स्वच्छ धुवून त्यातले पाणी निथळून घ्यावे नंतर कांदे बारीक चिरून आले, लसूण, मिरच्या, कोथिंबीर, खडा गरम मसाला घालून त्याची गोळी तयार करून घ्यावी. मटणाला तिखट, हळद आणि वाटणाची गोळी, मीठ गरम मसाला पावडर सगळे चोळावे. गॅसवर पातेलं तापवत ठेवून त्यात अंदाजे दोन पळ्या तेल घालावे.तेल चांगले तापले कि त्यात चिमूटभर हिंग, चिरलेला कांदा टाकावा आणि कांदा चांगला मंद आचेवर गुलाबी झाला कि त्यात सगळा मसाला लावलेले मटण घालून चांगले परतावे नंतर त्यात पाव वाटी किसलेले खोबरे (भाजून) वाटून टाकावे. हे सर्व परतवून झाले कि त्यात अंदाजानुसार पाणी घालून झाकण ठेवावे. चांगले शिजवावे, मऊ शिजले कि उतरवून एक बाऊलमध्ये काढून त्यावर चिरलेली कोथिंबीर घालावी. तयार झाले चमचमीत मटण.भाजणीचे वडेसाहित्य : दोन वाट्या भाजणी पीठ, साधारण दिड ते दोन वाट्या गरम पाणी, चार ते पाच लसूण पाकळ्या, चार ते पाच हिरव्या मिरच्या, मीठ, अर्धा चमचा हळद, दोन मोठे चमचे तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती : प्रथम एका ताटात भाजणीचे पीठ घेऊन, हिरवी मिरची व लसूण वाटून त्यात टाकावे. मीठ, हळद, तेल कोथिंबीर आणि गरम पाणी घालून ते पीठ वडे थापता येतील इतपत भिजवावे. भिजवलेले पीठ एक तासभर ठेवावे. नंतर कढई तापत ठेवून तेल चांगले तापले कि प्लास्टिकच्या पिशवीवर वडे थापून मंद आचेवर तळावे आणि चांगले तळून झाले कि मटणाबरोबर खावे.